विरार (प्रतिनिधी) – राष्ट्रनिर्माते, संविधानकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मनवेलपाडा येथे अभिमानाने उभारण्यात यावा अशी आंबेडकरी समुह, सृज्ञ नागरिक आणि संविधान प्रेमी जनता यांची मागील कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीसाठी विविध संघटनांनी महानगरपालिका यांना विनंती निवेदने दिले आहे.
परंतु ही मागणी सत्यात उतरतांना मात्र दिसत नव्हती. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील तरुण मनोज खाडे, सुविध पवार, समीर मोहिते, सुचित गायकवाड, संजय गायकवाड, प्रफुल्ल हळदे, सारिका सकपाळ, दुर्गा कांबळे हे अस्वस्थ झाले होते. शेवटी सरकार दरबारी न्याय मिळणार नाही या भावनेने आणि राष्ट्रनिर्माते, संविधानकार, भारतरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेल्या असीम श्रद्धेमुळे त्यांनी मंगळवार दिनांक १३. ०८.२०२४ रोजी मनवेलपाडा येथे अर्धाकृती पुतळा बसविण्याची शीघ्र कृती केली.
या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले. परंतु पुतळा अनधिकृत पध्दतीने बसवण्यात आला आहे. असे महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने मनवेलपाडा परिसरात जमू लागले. यादरम्यान पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या बरोबर चर्चांच्या अनेक फेर््या झाल्या, परंतु तोडगा मात्र निघत नव्हता.
शेवटी समाज बांधव मा. दिलीप गायकवाड यांनी जि. पालघर पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांना तातडीने भ्रमणध्वनीवर सदर घटनेची माहिती दिली. मा. श्री. रविंद्र चव्हाण साहेब यांनी पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या बरोबर वरिष्ठ पातळीवर चर्चा केली. त्यामुळे पुतळा आहे त्याच स्थितीत पुढील दोन दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. राष्ट्रनिर्माते, संविधानकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबत निवेदन घेऊन संविधान बंगल्यावर शिष्टमंडळ पोहचले त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय मंत्रालय मा. ना. श्री. रामदास आठवले साहेब यांना झालेला घटनाक्रम सांगितला गेला.
मा. ना. श्री. रामदास आठवले साहेब क्षणाचा ही विलंब न लावता संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या बरोबर संवाद साधून पुतळ्या बाबत अनुकूल भूमिका घेण्यास सांगितले आणि तरुणांवर कोणतेही गुन्हे दाखल करु नका अशी भूमिका घेतली.
त्यानुसार शुक्रवार दिनांक १६.०८.२०२४ रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी भेटण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे पदाधिकारी पोहचले. मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेवून पुढील निर्णय येईपर्यंत राष्ट्रनिर्माते, संविधानकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आहे त्याच स्थितीत ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे आता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा मनवेलपाडा येथून हटविला जाणार नाही. या पुतळ्याच्या संरक्षणाची जबाबदारी सध्याच्या परिस्थितीत सर्व समाज बांधवांनी घेतली आहे. दररोज २४ तास समाजबांधव छातीचा कोट पुतळ्या भोवती जागता पहारा देत आहेत. या मध्ये सर्व समाज बांधव आणि मान्यवर मंडळींचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या संघशक्तीच्या जोरावर हे शक्य झाले आहे.